PSRDF on the News

सोसायट्यांना हवंय महापालिका सभागृहात प्रतिनिधीत्व

एमपीसी न्यूज - राजकारण व निवडणुकीच्या ठरलेल्या मर्यादा मोडत, यावेळी फक्त मतदानच करायचे नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असा निर्धार करत पिंपळे सौदागर येथील 130 सोसायट्या एकत्र आल्या असून त्यांनी चार अपक्ष उमेदवारांचे स्वतंत्र पॅनेल यावेळी रिंगणात उतरवले आहे. या प्रयोगाला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हा शहरात उत्सुकतेचा विषय झाला आहे.


पिंपळे सौदागर परिसरात एकूण 130 हाऊसिंग सोसायट्या आहेत. या सोसायट्या एकत्र येऊन त्यांनी सोसायट्यांचे फेडरेशन देखील  बनविले आहे. या सोसायट्यांमध्ये सुमारे 36 हजार मतदार असल्याचा या फेडरेशनच्या पदाधिका-यांचा दावा आहे. पिंपळे सौदागराचा परिसराचा विकास झाला असला तरी सोसायट्यांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सोसायट्यांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका पालिका सभागृहात सोसायट्यांचे प्रतिनिधी जाणे आवश्यक असल्याने त्यांनी राजकीय पक्षांना पॅनेलमध्ये किमान दोन उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर चार अपक्ष उमेदवारांचे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. 


सोसायट्यांनी उभ्या केलेल्या पॅनेलमध्ये 'अ' जागेसाठी संदीप देवरे , 'ब'साठी कमलजीत कौर, 'क'साठी इंदु सूर्यवंशी तर 'ड' साठी ललित झुनझुनवाला असे चार अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले आहेत.


याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना सोसायटी पॅनेलमधीलया महिला उमेदवार  कमलजीत कौर म्हणाल्या की, पिंपळे सौदागर येथे सोसायटींचे प्रमाण जास्त आहे. तिथे सुशिक्षित लोकांचे वास्तव्य आहे. मात्र त्यानुसार येथील जुन्या लोकप्रतिनिधींनी कामे केलेली नाहीत. अगदी पाणी, सार्वजनिक शौचालये, उद्याने, खेळाचे मैदान या गोष्टी सुद्धा आम्हाला मिळालेल्या नाहीत. त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना मागणी केली होती मात्र ती पूर्ण झालेली नाही.


त्यामुळे यावेळी आपणच निवडणूक लढवत जिंकायचे व आपली कामे करवून घ्यायची, असे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी 130 सोसायटी एकत्र आल्या. त्यातील 11 जणांनी निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. त्यातील चार जणांचे आम्ही अपक्ष पॅनल उभे केले आहे, असेही कौर यांनी सांगितले.

उमेदवार ललित झुनझुनवाला म्हणाले की, पिंपळे सौदागर येथील 130 सोसायटींचे एकूण 36 हजार मतदार आहेत.  जे वर्षाला 32 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरतात.  मात्र त्यांच्या मागण्या इथे कोणी मान्य करत नाही. आम्हाला आमच्या छोट्या-छोट्या गरजांसाठीही भांडावे लागते. त्यामुळे आम्ही सोसायटींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेकडे त्यांचे दोन प्रतिनिधी जाहीर करावेत अशी मागणी केली होती. मात्र त्यातील केवळ शिवसेनेने आमची मागणी मान्य केली. त्यामुळे आम्ही आमचेच चार अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. ते या सुशिक्षित  प्रभागात अगदी प्रचार सुद्धा मतदरांच्या विचारानुसार करत आहेत. ज्यामध्ये व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर यांच्या वापरावर भर आहे.  त्यामुळे आम्ही यावेळी नक्की निवडून येऊ , असा विश्वासही  झुनझुनवाला यांनी व्यक्त केला.  



Watch Pimple Saudagar- Rahatani's traction on Zee News. PSRDF is gaining....